पुणे : कमला नेहरू रुग्णालयातील कचरा प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर रुग्णालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रुग्णालय परिसरात आढळून आलेल्या मिश्र कचऱ्यामध्ये जैववैद्यकीय कचरा असल्याचे निरीक्षण क्षेत्रीय कार्यालयाने नोंदवले असले, तरी हा कचरा रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून टाकण्यात आला असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कमला नेहरु रुग्णालय प्रशासनाने कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाला सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, रुग्णालयाचा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र गाडीची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र, त्यानुसार व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच सलग तीन ते चार दिवस घनकचरा विभागाची गाडी उपलब्ध न झाल्याने कचरा साचत गेला. याबाबत आरोग्य निरीक्षकांकडून वारंवार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला होता, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कचऱ्यामध्ये जैववैद्यकीय स्वरूपाचा काही कचरा आढळल्याच्या मुद्द्यावर प्रशासनाने म्हटले आहे की, रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि नातेवाईकांची वर्दळ असते. शिवाय, तीन ते चार दिवस कचरा साचल्यामुळे काही कचरा बाहेरून टाकण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कचरा अनेक दिवस पडून असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी अथवा नागरिकांनीही तेथे कचरा टाकला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाने आणखी एक मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून कोणतीही लेखी सूचना यापूर्वी देण्यात आलेली नव्हती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची माहिती वरिष्ठांना दिली असती, तर हा प्रकार टाळता आला असता, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला असून, त्याचा परिणाम शहरातील प्रमुख रुग्णालयाच्या प्रतिमेवर झाल्याची खंतही प्रशासनाने व्यक्त केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी आवश्यक दक्षता घेतली जाईल, असे कमला नेहरु रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी स्पष्ट केले आहे.