पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि पराक्रम आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. अत्याधुनिक एआर (Augmented Reality) आणि व्हीआर (Virtual Reality) तंत्रज्ञानाचा वापर करून शिवकालीन गड-किल्ले, युद्धकला आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणादायी गाथा जिवंत स्वरूपात विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अनुभवता येणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, गड-किल्ल्यांची रचना तसेच स्वराज्य स्थापनेचा इतिहास 3D आणि व्हर्च्युअल अनुभवातून पाहता येणार आहे. यामध्ये रायगड, प्रतापगड, तोरणा यांसारख्या ऐतिहासिक गडांचा आभासी प्रवास (Virtual Tour) उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
हा उपक्रम दुर्ग रत्न सोशल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना इतिहास प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इतिहासाबद्दलची आवड वाढण्यासोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव नव्या पिढीमध्ये अधिक दृढ होणार आहे.
याबाबत बोलताना वर्षा आनंद जोगदंड (अध्यक्षा, दुर्ग रत्न सोशल फाऊंडेशन) यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि शौर्यगाथा आधुनिक एआर-व्हीआर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दुर्ग रत्न सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असून सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तो पाहण्याची संधी मिळेल.”
तज्ज्ञांच्या मते, एआर-व्हीआर तंत्रज्ञानामुळे इतिहास शिक्षण अधिक प्रभावी आणि रोचक होईल. तसेच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार असून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास अत्याधुनिक पद्धतीने अनुभवता येईल. या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचा संदेश डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचण्यास मदत होणार आहे.