पणजी (गोवा) : महाराष्ट्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शिवचरित्राच्या प्रेरणेतून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
हिरोजी इंदलकर यांचे वंशज तथा माजी पोलिस अधिकारी अशोक इंदलकर, मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील आणि मिलिंद चौधरी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान, संशोधन, वैद्यकशास्त्र आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत गोव्याला राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
समाजातील त्यांच्या मौल्यवान आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल ‘सरदार हिरोजी इंदुलकर सेवा सन्मान’ पुरस्काराने डॉ. समीर दमारे, डॉ. संजयकुमार उदारवार, डॉ. स्नेहल गोवेकर आणि नेहा शैलेश आंद्रे गावस यांना गौरविण्यात आले. या सर्वांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणत अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
याचबरोबर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण खेळाडूंनाही ‘बहिर्जी नाईक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जिद्दी, परिश्रम आणि यशस्वी वाटचालीचे विशेष कौतुक करण्यात आले. युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुढे जावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि आदर्शांचा गौरव करणारी भाषणे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले. शिवजयंतीचा हा सोहळा केवळ उत्सव न राहता समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्याचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा एक अर्थपूर्ण उपक्रम ठरला.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949