मालेगाव महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांचा दणदणीत विजय

Share

शिंदे गटाच्या उमेदवाराचा २५ मतांनी पराभव; भाजप–एमआयएम तटस्थतेचा फटका

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार लता घोडके यांचा तब्बल २५ मतांच्या फरकाने पराभव केला.

८४ सदस्यसंख्या असलेल्या मालेगाव महापालिकेत महापौरपदासाठी शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत शेख नसरीन बानो यांना एकूण ४३ मते मिळाली, तर लता घोडके यांना केवळ १८ मतांवर समाधान मानावे लागले.

शेख नसरीन बानो यांना इस्लाम पार्टीचे ३५, समाजवादी पार्टीचे ५ आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक अशा एकूण ४३ नगरसेवकांनी मतदान केले. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडे १८ नगरसेवकांचे संख्याबळ असूनही उमेदवार लता घोडके यांना फक्त आपल्या पक्षाचीच मते मिळू शकली.

या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम (MIM) या दोन्ही पक्षांची भूमिका चर्चेचा विषय ठरली. एमआयएमकडे २१ तर भाजपकडे २ नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. एमआयएमने जर कोणालाही पाठिंबा दिला असता, तर निवडणुकीचं चित्र बदलू शकले असते.

महापौरपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. मात्र, प्रत्यक्ष लढत ही शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यातच झाली.विजयाची अधिकृत घोषणा होताच महापालिका सभागृहात सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *