मुंबई महापालिका निवडणूक! उद्धव ठाकरेंचा नैतिक विजय, शिंदे गटासमोर अस्तित्वाचे आव्हान

Share

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला तेव्हा ही लढत ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची असल्याची चर्चा होती. मात्र निकालानंतर चित्र स्पष्ट झाले असून, या निवडणुकीने उद्धव ठाकरे यांना पुन्हा उभे राहण्याचे बळ दिले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला असला, तरी संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेवर केंद्रित होते. मुंबईत भाजपने ८९ तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने २९ जागा जिंकून बहुमताचा ११४ चा आकडा पार केला आहे. मात्र या विजयापेक्षा अधिक चर्चा झाली ती उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या कडव्या संघर्षाची.

ठाकरे गटाची पुनरागमनाची लढाई

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. २०१७ मध्ये निवडून आलेले १२० हून अधिक नगरसेवक शिंदे गटात गेले होते. शाखा, कार्यकर्ते आणि संघटनात्मक बांधणी विस्कळित झालेली असताना, चिन्ह आणि आर्थिक बळ नसतानाही उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जोरदार लढत दिली. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाने ६५ जागा जिंकत महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला.

राज–उद्धव समन्वय ठरला महत्त्वाचा

या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समन्वय. यामुळे मराठी मतांची फूट टळली. ‘मराठी अस्मिता’ हा मुद्दा प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ठाकरे बंधूंना यश मिळाले. लालबाग, परळ, वरळी या मराठीबहुल भागांत ठाकरे गटाची कामगिरी लक्षवेधी ठरली.

शिंदे गटाची घसरण

शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह असूनही शिंदे गटाला मुंबईत अपेक्षित यश मिळाले नाही. ९० जागा लढवून केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. मिळालेल्या मतांची टक्केवारीही ठाकरे गटाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी राहिली. यामुळे भाजपवर असलेली शिंदे गटाची राजकीय अवलंबित्व अधिक स्पष्ट झाले आहे.

भाजपची वाढती ताकद, शिंदेंची चिंता

भाजपने मुंबईत ८९ जागा जिंकून आपले वर्चस्व वाढवले आहे. ‘धाकटा भाऊ’ असलेला भाजप आता पूर्णपणे ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत गेला असून, भविष्यात प्रादेशिक पक्षांची गरज उरणार नाही, हे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिंदे गटाची ‘बार्गेनिंग पॉवर’ घटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सत्ता महायुतीकडे, पण नैतिक विजय ठाकरेंचा

मुंबई महापालिकेत महायुतीला सत्ता मिळाली असली, तरी विस्कळित संघटना, आर्थिक मर्यादा आणि चिन्ह नसतानाही ६५ जागा जिंकणे हा उद्धव ठाकरे यांचा मोठा राजकीय विजय मानला जात आहे. मात्र मुंबईबाहेर इतर महापालिकांतील अपयश पाहता, राज्यव्यापी संघटनात्मक बांधणी करणे हे उद्धव ठाकरेंसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *