मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना, खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर असल्याचा दावा केला जात होता. मात्र, स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना तात्पुरता विराम मिळाला.
अशातच प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे.अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनेत्रा पवारांना दिल्लीचे आमंत्रण
दरम्यान, अजित पवारांचे अंत्यविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. हे आमंत्रण प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत तसेच राज्यातील सत्तासमीकरणांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.