अजित पवारांनंतर पवार घराण्याची पुढील पिढी मैदानात; पार्थ पवारांना राज्यसभेची संधी

Share

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्णायक फेरबदल घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता पवार घराण्यातील पुढील पिढीवर मोठी राजकीय जबाबदारी येऊन ठेपल्याचे स्पष्ट होत आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; राज्यसभेची जागा रिक्त

३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, याच जागेवर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

दोन वर्षांची की सहा वर्षांची टर्म?

महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत म्हणजेच सुमारे दोन वर्षे शिल्लक होती. मात्र ही अर्धवट टर्म पार्थ पवारांना न देता, त्यांना पूर्ण सहा वर्षांची राज्यसभा टर्म असलेल्या जागेवर पाठवण्याचा पर्याय पक्षात चर्चेत असल्याची माहिती आहे. यामुळे पार्थ पवारांना राष्ट्रीय राजकारणात दीर्घकालीन आणि स्थिर व्यासपीठ मिळू शकते.राज्यसभेची जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत हालचाली वाढवल्याचेही बोलले जात आहे.

अजित दादांनंतर पुढील पिढीवर थेट जबाबदारी

अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही अधिक सक्रिय होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात आधीपासूनच वर्तवला जात होता. बारामती लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, पवार कुटुंबातील पुढील पिढीवर थेट नेतृत्वाची जबाबदारी येऊन पडली आहे.

एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळतील, तर दुसरीकडे जय पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवारांचा राजकीय प्रवास

पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. आता राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवारांना पुन्हा एकदा राजकीय पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मंगळवारी नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला जाणार होते. मात्र त्याआधी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात, जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्या स्थळाला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी भेट दिली.

यावेळी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शरद पवार मुंबईकडे रवाना झाले, मात्र दिल्ली दौरा रद्द झाल्याने पुढील राजकीय हालचालींबाबत उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *