नवी दिल्ली: लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारत–चीन सीमेवरील डोकलाम वादाच्या मुद्द्यावरून संसदेत सलग दुसऱ्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या विषयावर बोलण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी सभागृहात तीव्र आक्षेप नोंदवला. परिणामी, लोकसभेतील 9 खासदारांचे उर्वरित अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्रातील भंडारा–गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश आहे.
माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील काही उताऱ्यांचा संदर्भ देत राहुल गांधी देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करू इच्छित होते. मात्र नियमांचा हवाला देत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना बोलू देण्यास नकार दिला. आजही हा विषय मांडता येणार नसल्याचं स्पष्ट होताच विरोधी पक्षातील सदस्य वेलमध्ये उतरले. काही खासदारांनी अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकल्याने वातावरण चिघळले आणि सभागृह तासभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृह पुन्हा सुरू होताच संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी 9 खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
निलंबित खासदारांची यादी
अरविंद सिंह, अमरेंद्र सिंह, गुरुदीप सिंह ओझोला, हिबी इडेन,
दीन कुरिया कोत्झी, प्रशांत पडोळे, किरणकुमार रेड्डी,
एस. व्यंकटरमण, मणिकम टागोर
या सर्व खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे.
निलंबनावर प्रशांत पडोळेंची संतप्त प्रतिक्रिया
निलंबनानंतर बोलताना खासदार प्रशांत पडोळे म्हणाले,“भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर बोलू इच्छिणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय. राहुल गांधींना मुद्दा मांडू न दिल्याने आम्ही विरोध केला, म्हणून आमच्यावर कारवाई झाली.”
“असंसदीय भाषा सत्ताधाऱ्यांकडून वापरली जाते, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. जनतेच्या हक्कासाठी फासावर जायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. निलंबन काही मोठी शिक्षा नाही; उद्यापासून आम्ही संसदेबाहेर आंदोलन करत राहू,” असा इशाराही त्यांनी दिला.
कोण आहेत प्रशांत पडोळे?
प्रशांत पडोळे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भंडारा–गोंदिया मतदारसंघातून मोठा राजकीय उलथापालथ घडवत भाजपचे सुनील बाबुराव मेंढे यांचा 36,680 मतांनी पराभव केला होता. त्यांच्या निलंबनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चा रंगली आहे.