पुणे: प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी गिरीश महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला असून, “तुम्ही पालकमंत्री म्हणून घेण्याच्या लायकीचेच नाही” अशी घणाघाती टीका केली आहे.
प्रजासत्ताक दिन 2026 रोजी झालेल्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने वाद निर्माण झाला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी थेट आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच, ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं, त्यांचं नाव प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी न घेणं ही अक्षम्य चूक आहे. बाबासाहेबांविषयी बोलायचं टाळणं म्हणजे नतदृष्टपणा आहे,” अशी घणाघाती टीका हाके यांनी केली.
पुढे बोलताना हाके म्हणाले, “तुम्ही मंत्री आहात, पालकमंत्री आहात आणि तरीही बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा उल्लेख करण्याची तुमची पात्रता नसेल, तर अशा लोकांना या मंत्रालयात काम करण्याचा अधिकार नाही.”या प्रकरणामुळे भाजपसह राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे असून, गिरीश महाजन यांच्याकडून यावर काय स्पष्टीकरण दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.