नीतीन भिलारे, उमेश गुरवांसह शिवसैनिकांचा जाहीर प्रवेश
महाबळेश्वर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, बावधन येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात माजी युवासेना तालुकाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणवादी नितीन शांताराम भिलारे यांच्यासह सहकारी शिवसैनिक तालुकाप्रमुख उमेश गंगाराम गुरव आणि बाबाजी शिवराम उंबरकर (तालुका प्रमुख) यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेषतः भिलार गटात या पक्षप्रवेशाचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. नितीन भिलारे हे गेली अनेक वर्षे सामाजिक, पर्यावरण व युवक चळवळीत सक्रिय असून, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या संघटन बांधणीला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. तसेच तब्बल २७ वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेले उमेश गुरव व राजकीय अनुभव असलेले बाबाजी उंबरकर यांच्या सहकार्यामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “भाजप हा विकासाच्या विचारांवर काम करणारा पक्ष आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव व ताकद निश्चितच पक्षाला उपयोगी ठरेल.”
दरम्यान, नितीन भिलारे, उमेश गुरव व बाबाजी उंबरकर यांनी, “आमच्या प्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यात भाजप अधिक सक्षम होईल. विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू,” असा विश्वास व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी आमदार मदन भोसले, निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, वाई पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, चिन्मय कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल भिलारे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली भिलारे, माजी सभापती विजयकुमार भिलारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, या पक्षप्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपा अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.