चंद्रपूरमध्ये पाच वर्षे काँग्रेसचाच महापौर! निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार; विजय वडेट्टीवार

Share

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या वादावर अखेर पडदा पडला असून, येथील महापौरपद पुढील पाच वर्षे काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट विधान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. चंद्रपूरमधील गटनेता व महापौरपदाचा अंतिम निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. मात्र, भाजपचे कितीही नेते आरोप करत असले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर बसेल, असा ठाम दावा वडेट्टीवार यांनी केला. नेत्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे समाधान महत्त्वाचे असून सर्वांना मान्य होईल असा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महापौर निवडीसाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांशी चर्चा पूर्ण झाली आहे. चंद्रपुरात शिवसेना काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवरही वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले. आरक्षण प्रक्रिया पारदर्शक नसून, भाजपचे नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने आरक्षण ‘फिक्स’ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नागपुरात खुला महिला प्रवर्ग पडण्याबाबत भाजपने आधीच उमेदवार ठरवला होता आणि त्यानुसारच आरक्षण जाहीर झाले, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

मनसे नेत्यांकडून चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे आरोप केले जात असल्यावरही वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. चंद्रपुरात भाजप-काँग्रेस एकत्र असल्याचे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले, असा सवाल करत मनसे ही भाजपची ‘बी टीम’ असल्याची टीका त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम यांचे छुपे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाराणसी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाट भाजप सरकारने जमीनदोस्त केल्याचा आरोप करत, भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकीपुरतेच असून सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला जात असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *