मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; महायुतीचा महापौर निश्चित

Share

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. निकाल जाहीर होताच मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपाने मोठी झेप घेत मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या निवडणुकीकडे केवळ राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्याने राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. दुसरीकडे, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली होती.

विशेष बाब म्हणजे भाजपकडून केंद्रातील कोणताही मोठा नेता प्रचारासाठी मुंबईत उतरला नव्हता. राज्यातील नेतृत्वानेच ही निवडणूक हाताळली आणि त्याचा थेट फायदा निकालात दिसून आला.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे 

भाजप : ८९ जागा

शिवसेना (शिंदे गट) : २९ जागा

ठाकरे बंधूंची युती : एकूण ७३ जागा

शिवसेना (ठाकरे गट) : ६७

मनसे : ६

काँग्रेस : २४ जागा

इतर व अपक्ष : १० जागा

या निकालांमुळे मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोठ्या अपेक्षा असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. परिणामी, मुंबईच्या सत्तासमीकरणात मोठा बदल झाला असून, महापालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.आता महायुतीच्या नेतृत्वाखाली मुंबईचा कारभार कसा चालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *