पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCP ने पाळला

Share

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे बिनविरोध; सिंहगड रोडला प्रथमच मान

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता ही प्रक्रिया केवळ औपचारिकता राहिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे आधीच निश्चित झाले होते.

सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळाला आहे. मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून यंदाही त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांच्या या राजकीय वाटचालीत महापौरपदाची निवड हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी रात्री महापौरपदाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत तीन नावांवर चर्चा करण्यात आली होती. मात्र अर्ज दाखल होण्यापूर्वी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

पुणे महापालिकेत भाजपने ११९ जागांवर दणदणीत विजय मिळवला असून त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित झाले होते. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असल्याने मंजूषा नागपुरे यांच्यासह वर्षा तापकिर आणि मानसी देशपांडे ही नावे आघाडीवर होती. मात्र मंजूषा नागपुरे यांनी बाजी मारली.

दरम्यान, पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण निवडणूक झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर व उपमहापौरपदाची निवड बिनविरोध करण्यावर एकमत झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *