ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका आंदोलन प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने ही फाशीची शिक्षा सुनावली. सन 2024 साली बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता, त्यात आज (सोमवार) न्यायालायने महत्पूर्ण निकाल दिला आहे.
शेख हसीना यांना 2024 च्या या आंदोलनानंतर देश सोडावा लागला होता. या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, शेख हसीना यांच्याकडून हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आले आहेत. हिंसाचारानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे सरकार स्थापन झाले होते.
2024 च्या जुलै महिन्यात सरकारविरोधात मोठं आंदोलन उभारण्यात आले होते. दोन महिने चाललेल्या या आंदोलनादरम्यान 1400 नागरिकांची हत्या झाली, तर जवळपास 25 हजार जखमी झाले होते, अशी माहिती मुख्य अभियोक्ता ताजुल इस्लाम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी दिली. या खटल्यात त्यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीन सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध हा खटला चालवण्यात आला आहे. बांगलादेशमधील टेलिव्हीजनवर या निकालाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
बांगलादेशातील न्यायप्राधीकरण ICT च्या मुख्य न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटले की, ‘शेख हसीना यांनी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना मारण्याचे आदेश दिले होते. ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत झालेल्या फोन संभाषणात हसीना यांनी हिंसक कारवाईचे निर्देश दिले आणि विद्यार्थ्यांचा अपमान केला, ज्यामुळे निदर्शने आणखी भडकली. हसीना यांचे वक्तव्य अपमानजनक आणि हिंसा भडकावणारे होते. त्यांनी जाणूनबुजून आपल्या आदेशांद्वारे लोकांचा जीव घेण्याचे षडयंत्र रचले. कोर्टाकडे हसीना आणि विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डही उपलब्ध आहेत, जे त्यांनी दिलेले आदेश अधोरेखित करतात.’