नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली बॉम्ब स्फोटाने हादरून गेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर गेले आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नियोजित दौरा कायम ठेवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा भूतानचा चौथा दौरा असून, या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री व भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे.
ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी (ता. १०) सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर गेले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक संयुक्तपणे 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्संगचू-२ जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करतील. तसेच ते भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, मोदी भूतानमध्ये सुरू असलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवातही सहभागी होतील. पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देऊन शांतीसाठी प्रार्थना करतील.