नवी दिल्ली: दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी झालेल्या विरोधी पक्षांच्या मोर्चामध्ये उपस्थित न राहिल्याबद्दल भारतीय युवक काँग्रेसने एका व्यापक शिस्तभंगाच्या कारवाईत, सुमारे २०० सदस्यांना निलंबित केले आहे.
आतापर्यंत सात राज्यांमधील किमान १८५ सदस्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. शिस्तभंगाच्या आढाव्यात हा आकडा अखेरीस ५०० पर्यंत वाढू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, युवक काँग्रेसच्या काही निलंबित सदस्यांनी, पक्षाला अनेक वर्षे सेवा देऊनही पक्षाने त्यांना एकाच घटनेवरून कसे पारखले आहे, याबद्दल आश्चर्य आणि धक्का व्यक्त केला आहे.
आम्ही पक्षासाठी एफआयआरला सामोरे गेलो आणि तुरुंगातही गेलो. केवळ एका कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यामुळे आम्हाला हटवले जात आहे का? संघटनेने त्यांना स्पष्टीकरण देण्याची संधी न देता पदावरून हटवल्यानंतर, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित राजोरिया यांनी सांगितले.
राजोरिया म्हणाले, की त्यांच्या १५ वर्षांच्या सेवेनंतरही काँग्रेस पक्षाची युवा शाखा मनमानी पद्धतीने वागत आहे. या काळात पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर १५ एफआयआर दाखल झाले आणि त्यांना तीन-चार वेळा तुरुंगवासही भोगावा लागला.
त्यांनी एक कार्ड दाखवले, ज्यावर त्यांच्या दिवंगत काकांच्या तेराव्या दिवसांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, की घरातील दुःखद घटनेबद्दल आणि १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेसाठी दिल्लीत येण्यास असमर्थ असल्याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाला खूप आधीच कळवले होते. एका कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याबद्दल तातडीने पदावरून दूर करण्यात आल्यानंतर, अशा परिस्थितीत पक्ष पुन्हा सत्तेत परतण्याची अपेक्षा कशी करू शकतो, असा प्रश्न राजोरिया यांनी उपस्थित केला आहे.
युवक काँग्रेसने सर्वाधिक कारवाई मध्य प्रदेशात केली असून, तेथे ६० सदस्यांना निलंबित केले आहे. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये ४९ आणि पश्चिम बंगालमध्ये २६ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच तेलंगणामध्ये १४, मध्य उत्तर प्रदेशात १३, काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशात १३ आणि हरियाणात १० सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.
१ नोव्हेंबरच्या आंदोलनापूर्वी, संघटनेने सर्व राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा सदस्यांना कोणत्याही अपवादाशिवाय रॅली आणि त्यापूर्वीच्या मोर्चात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. डिजिटल पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यासाठी, संघटनेने मिंटो रोड येथील संमेलन स्थळी बारकोड स्कॅनर बसवले आणि सदस्यांना व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना ‘विथ आयवायसी’ नावाच्या अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशनवर चेक-इन करण्यास सांगितले होते.
युवक काँग्रेसतर्फे सांगण्यात आले होते, की रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढण्यासाठी मिंटो रोडवर सुमारे १५ हजार कार्यकर्ते जमले होते, परंतु अंतर्गत आकडेवारीनुसार ॲप्लिकेशनवर केवळ २,८३१ जणांनीच नोंदणी केली होती. एका अंतर्गत आढाव्यात असे आढळून आले की, मिंटो रोड आणि रामलीला मैदानादरम्यानची खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तसेच कार्यकर्त्यांमध्ये तांत्रिक जागरूकता आणि स्वारस्याचा अभाव, यांमुळे डिजिटल चेक-इनमध्ये अडथळा निर्माण झाला. परंतु, मोठ्या संख्येने सदस्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता या कार्यक्रमाला पूर्णपणे दांडी मारली होती.
बेजबाबदार लोकांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या जागी मेहनती कार्यकर्त्यांना जबाबदारी देता येईल. देशात बदलाचे वातावरण आहे. पुढच्या वेळी आपण दिल्लीत ५० हजार लोकांना एकत्र आणू शकतो. त्यामुळे संघटनेचे नेतृत्व सक्रिय लोकांनीच केले पाहिजे, असे चिब पुढे म्हणाले.