मुंबई महापालिकेत भाजपची ‘मोठी खेळी’ ठरणार? महापौर निवडीत मनसेचा पाठिंबा मिळण्याची चर्चा

Share

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक यश मिळवत ८९ नगरसेवक निवडून आणले आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने भाजपचा महापौर निश्चित मानला जात असतानाच आता राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा रंगू लागली आहे. भाजपच्या महापौर उमेदवाराला मनसेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौर पदावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव पाहायला मिळाला होता. शिंदे गटाने अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली होती. मात्र हा दबाव झुगारून देत भाजपने आपलाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबई महापालिकेत राजकीय समीकरणे अधिक मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, भाजपला मनसेचा पाठिंबा मिळण्याची चर्चा अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरत आहे. कारण निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत भाजपविरोधात मैदानात उतरले होते. मात्र आता मनसेचे नगरसेवक भाजपच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. हा निर्णय थेट राज ठाकरे यांचा आहे की स्थानिक पातळीवर नगरसेवकांनी घेतलेला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

मुंबई महापालिकेत भाजपनंतर शिवसेना ठाकरे गट हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना ६५ जागा मिळाल्या आहेत. मनसेने ६ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने २९, काँग्रेसने २४, तर अजित पवार गटाने ३ नगरसेवक निवडून आणले आहेत.

सध्याच्या घडीला महायुतीकडे एकूण १२१ नगरसेवक आहेत, तर बहुमताचा आकडा ११४ आहे. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपला मनसेची साथ का हवी आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपला संख्याबळाबरोबरच राजकीय संदेश देण्यासाठी आणि ठाकरे बंधूंच्या युतीत फूट पाडण्यासाठी ही खेळी असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *