भारतीय वंशाच्या मुस्लीम युवकानं अमेरिकेत घडवला इतिहास; ट्रम्प यांना मोठा धक्का…

zohran mamdani donald trump
Share

न्यूयॉर्क : भारतीय वंशांचा मुस्लीम सर्वात तरुण असलेला नेता महापौर म्हणून निवडून आला आहे. ज्याला ट्रम्प यांनी सर्वाधिक विरोध केला तोच सगळ्यात जास्त मतांनी निवडून आल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमध्ये राजकीय उलटफेर झाला आहे. भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शानदार विजय मिळवून इतिहास रचला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. कारण ट्रम्प यांची इच्छा ममदानी विजयी होऊ नये अशी होती. ममदानी यांनी ही निवडणूक जिंकवून दाखवली. ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता ममदानी यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला. जोहरान ममदानी यांच्या या विजयामुळे अनेक विक्रम एकाचवेळी रचले गेले आहेत. ममदानी हे केवळ ३४ वर्षांचे आहेत आणि ते न्यूयॉर्क सिटीचे गेल्या १०० वर्षांतील सर्वात तरुण महापौर ठरले. याशिवाय, ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर बनणारे पहिले भारतीय वंशाचे मुस्लीम आहेत. निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणांमध्येही ममदानी महापौरपदासाठी सर्वात आवडते उमेदवार म्हणून समोर आले होते आणि त्यांनी अपेक्षेनुसार ही निवडणूक जिंकली.

ममदानी यांची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आहे. ते प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे सुपुत्र आहेत आणि राजकारणात येण्यापूर्वी ते स्वतः एक रॅपर म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म युगांडाची राजधानी कंपाला येथे झाला होता, पण वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कला आले आणि येथील नागरिक बनले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या विजयाला विरोध दर्शवला होता. या निवडणुकीच्या निकालामुळे ट्रम्प यांच्या विचारधारेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. न्यूयॉर्कसारख्या महत्त्वाच्या शहरात अल्पसंख्याक वंशाच्या आणि तरुण उमेदवाराला मिळालेला हा विजय अमेरिकेतील राजकीय बदलाचा आणि विविधतेचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे. ममदानी यांचा विजय केवळ न्यूयॉर्कसाठीच नाही, तर अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आणि मुस्लिम समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण यश मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *