उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला (शिंदे गट) आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात हालचाल निर्माण झाली आहे.
वंचितकडून निवडून आलेल्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेत शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. यावेळी कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.
आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभागातील विकासकामांना गती मिळावी, यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
या भेटीप्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांचीही उपस्थिती होती.या घडामोडीमुळे उल्हासनगर महापालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.