नवी दिल्लीः अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देशांनी लादलेले निर्बंध आणि त्यांच्या आक्रमक कृतींवर, रशिया आणि इराणने शुक्रवारी टीका केली. ब्रिक्सने अशा प्रकारची आव्हाने आणि दबावांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देता येईल, अशी धोरणे विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, ही परिषद पाश्चात्यविरोधी व्यासपीठ बनू न देण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये बोलताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले, की गेल्या काही वर्षांत इराणवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत, परंतु अलिकडच्या काही महिन्यांत इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलची लष्करी आक्रमकता आणखी धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे केवळ भौतिक नुकसानच झाले नाही, तर आर्थिक सुरक्षा ही राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षेपासून वेगळी करता येत नाही, हे महत्त्वाचे सत्यही उघड झाले आहे.
जेव्हा एखाद्या देशाची व्यापार, ऊर्जा पायाभूत सुविधा किंवा वित्तीय प्रणाली राजकीय किंवा लष्करी दबावाखाली येते, तेव्हा त्याचा परिणाम देशाच्या सीमांच्या पलीकडे जातो आणि प्रादेशिक किंवा जागतिक स्थिरतेवर परिणाम करू शकतो, असे ते म्हणाले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपले जुने वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी, प्रत्येक शक्य पद्धतीचा अवलंब करणाऱ्या नेत्यांवर टीका केली. असे नेते थेट शारीरिक बळाचाही वापर करतात. त्यामध्ये औद्योगिक आणि वाहतुकीसंदर्भातील पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय वाहतूक मार्ग रोखण्याचे आणि जहाजे जप्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. इतकेच नाही, तर इतरांच्या हिताऐवजी स्वतःच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करू पाहणाऱ्यांवर तथाकथित दुय्यम स्तरावरील निर्बंधां’ची धमकी देऊन बेकायदा निर्बंध लादले जात आहेत, असे पुतीन म्हणाले.
ट्रम्प प्रशासन ब्रिक्स वाटाघाटींवर बारकाईने लक्ष ठेवून असेल, याची भारताला कल्पना आहे. निर्बंधांमुळे रशिया आणि इराण संतप्त आहेत आणि चीन डॉलरमुक्ती व पाश्चात्य-नियंत्रित स्विफ्टला टक्कर देऊ शकेल अशा सीमापार पेमेंट प्रणालीसारखे उपक्रम राबविण्यात उत्सुक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सला असलेला आपला विरोध कधीही लपवलेला नाही.
पुतीन यांनी व्यापार, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी एका गुंतवणूक मंचाची मागणी केली. ते म्हणाले, की आम्ही आमच्या भागीदारांसोबत मिळून जगाच्या ऊर्जा आणि अन्न सुरक्षेमध्ये योगदान देण्यासाठी आणि ट्रान्स-आर्क्टिक ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर व उत्तर-दक्षिण आंतरराष्ट्रीय कॉरिडॉरसारखे विश्वसनीय जागतिक मार्ग संयुक्तपणे तयार करण्यासाठी रशिया तयार आहे.
इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान म्हणाले, की अन्न आणि ऊर्जा सुरक्षा हे आर्थिक सुरक्षेचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. इराण, आपल्या प्रचंड ऊर्जा साठ्यांमुळे आणि उत्कृष्ट भौगोलिक स्थानामुळे, ब्रिक्सच्या अन्न, ऊर्जा आणि वाहतूक पुरवठा साखळ्यांमध्ये एक मोक्याचा भागीदार म्हणून भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.
त्यांनी स्थानिक चलनांमधील व्यापार वाढवण्याचे, १० अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक निधीसह पुनर्विमा पूल तयार करण्याचे आणि नवीन विकास बँकेमार्फत पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याचे समर्थन केले. पुतीन यांनी एनडीबीला पाठिंबा दिला आणि एक नवीन गुंतवणूक मंच तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला.