मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारकडून नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचे ठरले आहे. शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांवर असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही. तुम्ही असले सेंटर सुरू केले की आम्ही फोडणार, असा खुला इशारा देताना मला मुख्यमंत्री करा यासाठी किती लाचारी करणार? असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा गुरुवारी रंगशारदा सभागृहात पार पडला. यावेळी मतदान यंत्राच्या घोळाबाबत किंबहुना मतचोरी कशी होऊ शकते, याचे प्रात्याक्षिक मनसेच्या मंचावर उपाध्याय आणि पटेल नामे गृहस्थांनी सादर केले. त्यानंतर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी स्वच्छ मतदार याद्यांचा आग्रह धरत १ तारखेच्या मोर्चाला येण्याची विनंती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. एकनाथ शिंदे यांच्या पर्यटन विभागाने त्यासंदर्भात शासकीय अध्यादेश देखील काढला आहे. मला मुख्यमंत्री करा, यासाठी किती लाचारी करणार? तुम्ही असले प्रकार करून किती लाचारी करताय, हे मोदींना माहितीही नसेल, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.
नमो टुरिझम सेंटर जर किल्ल्यांवर सुरू केले तर आम्ही मागे पुढे न पाहता फोडून टाकणार, असे खुले आव्हान राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले. गड किल्ल्यांवर केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले.