नवी दिल्ली: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा आणि मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर इतिहासात इटलीमध्ये सर्वाधिक काळ सतत पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मेलोनी यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खास पोस्ट शेअर करत मेलोनी यांचे अभिनंदन केले. “माझ्या प्रिय मैत्रीण पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे इटलीच्या युद्धोत्तर इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ सतत पंतप्रधान राहिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. मेलोनी यांची ही यशोगाथा इटलीच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला भक्कम विश्वास दर्शवते. आगामी वर्षांमध्येही त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही पुनरुच्चार केला. “मेलोनी यांच्या मैत्रीमुळे भारत-इटली यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होण्यास मदत झाली आहे. दोन्ही देशांतील जनतेच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी आपण मेलोनी यांच्यासोबत सातत्याने काम करण्यास उत्सुक आहे.’
जॉर्जिया मेलोनी यांचे तीन दलांचे आघाडी सरकार तब्बल 1,413 दिवसांपासून सत्तेत आहे. त्यांनी 2000 च्या दशकातील सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या सरकारचा विक्रम मागे टाकला आहे. इटलीमध्ये वारंवार सरकारे बदलणे आणि राजकीय अस्थिरता असणे हे अत्यंत सामान्य मानले जाते. अशा स्थितीत मेलोनी यांचे सरकार सलग चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असणे ही इटलीच्या राजकारणातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मेलोनी म्हणाल्या, ‘सरकारची स्थिरता केवळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नसते, तर यामुळे देशाला दीर्घकालीन योजना आखण्यास आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास मदत होते.’
पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी