नवी दिल्लीः विरोधी पक्षाचे खासदार आज सायंकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकत्र जमतील आणि रात्री ८ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी येथे दिली.
कथित ‘व्होट चोरी’च्या निषेधार्थ कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) शनिवारी जंतर मंतर येथे आयोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडी अलायन्सच्या खासदारांनी आपले आंदोलन तीव्र केले असतानाच या घडामोडी घडत आहेत.
दिल्ली मेट्रोने जाहीर केले आहे की, परिस्थिती सामान्य होईपर्यंत शुक्रवार रात्री ९ वाजल्यापासून सर्व स्थानके बंद राहतील. यापूर्वी, संवेदनशील ठिकाणांकडे होणाऱ्या गर्दीच्या हालचालींबद्दलच्या चिंतेमुळे दिल्ली पोलिसांनी ५७ स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करण्याचा आणि ट्रेनची वारंवारिता कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता.
नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांजवळ संभाव्य वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ९ आणि १० ऑक्टोबर रोजी अनेक मेल, एक्सप्रेस, मेमू आणि ईएमयू सेवा रद्द केल्या आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आपल्या ट्रेनची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिल्लीतील किरकोळ मद्य विक्रीची दुकानेही ९ आणि १० ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आंदोलनाची पूर्वसूचना देण्यास झालेला विलंब, यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये नियमांचे पालन न करणे आणि कायदा व सुव्यवस्थेची चिंता, या कारणास्तव १० ऑक्टोबरच्या निदर्शनासाठी सीजेपीने मागितलेला परवानगी अर्ज दिल्ली पोलिसांनी फेटाळला आहे.
पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी सांगितले की, प्रस्तावित आंदोलनाच्या किमान १० दिवस आधी विनंती सादर करण्याची अट या अर्जात पूर्ण झालेली नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्यात लागू आहे. या कलमाद्वारे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सीजेपी कार्यकर्ते अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी निदर्शनापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी जंतर मंतरपर्यंतचा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.
गुरुवारी, इंडी अलायन्सच्या नेत्यांनी मतदार यादीच्या पुनर्विलोकनातील कथित अनियमिततेवरून कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजघाटावर धरणे आंदोलन केले. काँग्रेसचे महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, विरोधी पक्षाने प्रथम २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीची वेळ मागितली आणि ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एक विनंती सादर केली.
हे आंदोलन दिल्लीबाहेरही पसरले असून, आरजेडीचे ज्येष्ठ नेते तेजस्वी यादव यांनी पाटणा येथे निदर्शनाचे नेतृत्व केले. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीतील विरोधी पक्षांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
बुधवारच्या आंदोलनानंतर, दिल्ली पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली तीन एफआयआर दाखल केले आहेत. यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा यांच्या नावांचा उल्लेख आहे. बॅरिकेड लावलेले गेट उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर बुधवारी राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘झेडप्लस सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यासाठी सीआयएसएफने अतिरिक्त राखीव जवान तैनात केले आहेत.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आयुक्तांमधील मतभेद हे संस्थात्मक विचारविनिमयाचा भाग असून, त्यांचे आदेश प्रस्थापित कायदेशीर प्रक्रियेनुसारच दिले जातात. ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा विरोधकांनी निर्धार आहे.
One thought on “राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था; इंडी अलायन्सचे प्रतिनिधी रात्री ८ वाजता राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार”