मुंबईः चालू शतकाच्या अखेरपर्यंत समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता असून, मुंबई कायमस्वरूपी पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहराच्या असुरक्षिततेचे नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही दुसरी अशी पाहणी ठरणार आहे.
सध्या चालू असलेल्या नवीन हवामान-जोखीम मूल्यांकनामध्ये, मुंबईच्या १४९ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा नकाशा तयार केला जाणार असून, धोक्यात असलेल्या वस्तीच्या भागांची ओळख पटविली जाईल आणि भू-वापर, किनारी विकास व हवामानातील बदलांमुळे शहराची असुरक्षितता कशी आणि किती बदलली आहे याचे मूल्यांकन केले जाईल. हा अहवाल पुढील वर्षी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अलीकडील एका अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, २०२४ मध्ये जागतिक समुद्राची पातळी विक्रमी ५.९ मिमीने वाढली आहे आणि उत्सर्जनात कपात करण्याच्या आक्रमक योजना असूनही, सन २१०० पर्यंत त्यात किमान ०.५ मीटरची वाढ होण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पश्चिम अंटार्क्टिक प्रदेशात बर्फाचे थर अस्थिर होऊ लागले असून, काही वर्षांत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. बर्फाची अस्थिरता आणि बर्फ वितळण्याच्या क्रियेमुळे समुद्राच्या पातळीतीव वाढ दोन मीटरपर्यंत असू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या मूल्यांकनाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या किनारपट्टीवर झालेल्या लक्षणीय बदलांमुळे हा नवीन अभ्यास आवश्यक होता.
गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या किनारपट्टीमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. पश्चिम समुद्रकिनारी १०० हेक्टरहून अधिक अरबी समुद्राची जमीन भरून किनारी मार्ग उभारण्यात आला आहे. पूर्वेकडील बाजूला, मिठागरांच्या जमिनी विकासासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, जमिनीच्या एकूण वापराच्या पद्धतीतही बदल झाला आहे. त्यामुळे, नव्याने धोक्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
जागतिक स्तरावर समुद्र पातळी वाढीचा आढावा घेणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मूल्यांकनाच्या विपरीत, बीएमसीचा अभ्यास विशेषतः मुंबईवर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये किनारपट्टीच्या असुरक्षिततेस कारणीभूत स्थानिक घटकांचा अभ्यास केला जाईल, भविष्यातील समुद्र पातळी वाढीचा अंदाज वर्तवला जाईल आणि किनारपट्टीला लागून राहणाऱ्या व धोक्यात येऊ शकणाऱ्या लोकसमूहांची ओळख पटविली जाईल.
बीएमसीच्या २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या मुंबई हवामान कृती योजनेत किनारपट्टीवरील पूर, वाढते प्रदूषण, हरित आच्छादनाचा ऱ्हास आणि वाढती शहरी उष्णता यांना शहरासमोरील प्रमुख हवामानविषयक धोके म्हणून ओळखले होते. तसेच, २०५० पर्यंत मुंबई बेट शहराचा ८० टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो, असा अंदाजही वर्तवला होता.
शास्त्रज्ञांनी समुद्राच्या पातळीतील वाढीचा संबंध जागतिक तापमानवाढ आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानाशी जोडला आहे. २०२२ च्या एमसीएपी अहवालात गेल्या दोन दशकांमध्ये अरबी समुद्रातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात सातत्याने वाढ झाल्याचे नमूद केले आहे.
मेरीलँड विद्यापीठाचे मानद प्राध्यापक आणि आयआयटी मुंबईचे अभ्यागत प्राध्यापक रघु मुर्तुगुड्डे म्हणाले की, युरोप आणि पश्चिम आशियातील तापमानवाढीमुळे अरबी समुद्राच्या तापमानातही वाढ होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पावसाचे स्वरूप अधिक अनियमित होत असल्याचे दिसून येत आहे आणि मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस आणि उंच लाटा या एकत्रित घटकांमुळे मुंबईत पाणी साचत असून, त्यामुळे या बेट शहरात राहणाऱ्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) समुद्रशास्त्रज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणाले की, मुंबईची भौगोलिक रचनाच तिला विशेषतः असुरक्षित बनवते.
जलद विकास, काँक्रिटीकरण आणि भू-वापरातील बदलांमुळे पूरमैदाने आटतात आणि नद्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स खारफुटीच्या जमिनीवर बांधण्यात आले, तर रस्ते आणि अतिक्रमणामुळे मिठी नदीचे रूपांतर एका नाल्यात झाले. मुंबईतील पूर ही हवामान बदलाची समस्या नसून, अनियोजित विकासामुळे निर्माण झालेली व्यवस्थापनाची समस्या आहे, असे ते म्हणाले.
मुंबईची लवचिकता सुधारण्यासाठी खारफुटी आणि किनारी पाणथळ जागांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरेल, असे कोल म्हणाले.
खारफुटीची जंगले आणि पूरमैदाने पारंपरिकरित्या शहराच्या फुफ्फुसांप्रमाणे काम करतात, शहराचे पुराच्या पाण्यापासून आणि जोरदार वाऱ्यांपासून संरक्षण करतात. या किनारी पाणथळ जागांचे संरक्षण आणि विस्तार केल्याने समुद्राची पातळी वाढण्याच्या धोक्याला तोंड देण्याची मुंबईची क्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते, तसेच जैवविविधता आणि सागरी जीवांना सुरक्षित अधिवास मिळू शकतो, असे ते म्हणाले.
एमसीएपीने २००८ ते २०२१ दरम्यान मुंबईच्या खारफुटीच्या क्षेत्रात लक्षणीय बदल नोंदवले होते. अहवालानुसार, धूप आणि गाळ साचल्यामुळे ३२५ हेक्टर क्षेत्रातील दाट खारफुटीचे क्षेत्र एकतर विरळ झाले होते किंवा त्याचे भरती-ओहोटीच्या चिखलाच्या मैदानांमध्ये रूपांतर झाले होते, तर सुमारे ३०५ हेक्टर क्षेत्रात घनता वाढली होती.