मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चाची परवानगी नाकारली, जरांगे पाटील म्हणाले…

Share

जालना: मुंबईतील आझाद मैदानात उपोषणासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. या नकाराच्या निषेधार्थ त्यांनी आजपासून पाणी आणि औषधोपचारही बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलीस ठाण्याने या आंदोलनाला स्पष्ट परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी १५ सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दुपारी जरांगे पाटील यांच्या प्रतिनिधींनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनाच्या परवानगीचा अर्ज सुपूर्द केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणास्तव पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या वतीने आलेल्या अर्जावर आपले उत्तर देताना परवानगी नाकारत असल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “गेल्या वर्षीही गणेशोत्सव होता आणि आम्ही शांततेत आंदोलन केले होते. न्यायालय जिथे आंदोलनाची परवानगी देते, तिथे पोलीस मात्र द्वेषभावनेने वागत आहेत. राज्य सरकार सोयीनुसार कायदा चालवत असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्य अस्थिर करण्याचे काम करत आहेत.” ही हुकूमशाही आणि गुंडगिरी असून आपण सरकारसमोर कधीही शरण येणार नाही किंवा गुडघे टेकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पोलिसांच्या या निर्णयाविरोधात जरांगे पाटलांचे वकील आता कायदेशीर पावले उचलणार आहेत. पोलीस आयुक्तांकडे दाद मागायची की न्यायालयात धाव घ्यायची, याचा निर्णय कायदेतज्ज्ञ घेतील. “आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच आंदोलन करू,” असे सांगत जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. जरांगे पाटलांनी पाणी व औषधोपचार सोडण्याचा निर्णय घेतल्याने उपोषण आंदोलन चिघळण्याची भीती आहे.

मनोज जरांगे यांची मुंबईला जाण्याची घोषणा; मुक्कामाचे ठिकाण ठरलं; अडवलंच तर…

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट…

मराठ्यांचा मराठ्यांशी संघर्ष झाल्यास एकनाथ शिंदेच जबाबदारः मनोज जरांगे यांचा परखड इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!