मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरील उपोषणाबाबत मराठा नेते मनोज जरांगे ठाम आहेत. सोमवारी राज्याच्या तीन मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन, उपोषण मागे घेण्यासंदर्भात त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, आपल्या निर्णयावर आपण ठाम आहोत, उपोषण कोणत्याही कारणाने मागे घेण्यात येणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरकारला हीच भाषा समजते, असे सांगून ब्राह्मण समाजानेही उपोषणाचे अस्त्र उपसले आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र त्यांनी ओबीसी उप-वर्गीकरणाचीही मागणी करावी, अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली. ते म्हणाले, की जरांगे यांनी ५८ लाख नोंदीच्या आधारे कुणबी दाखले देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांचा जीआर काढून त्यांनाही कुणबी दाखले देण्यात यावेत, असा त्यांचा आग्रह आहे. याचा अर्थ संपूर्ण मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन, त्यांना ओबीसी वर्गात समाविष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, सरकारला उपोषणाच्या भाषेशिवाय दुसरी भाषा कळत नाही, म्हणून २९ ऑगस्ट पासून जालना येथे उपोषण करणार असल्याचं सकल ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की ब्राह्मण समाजाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. ब्राह्मण समाजाला यापूर्वी दिलेला शब्द या शासनाने पूर्ण केला नसल्याने, उपोषण करण्याची वेळ आली आहे. जालन्यातील गांधी चमन येथे हे उपोषण करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, की ब्राह्मण समाजामध्ये शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे. शासन समाजाला शिकू देत नाही. शिक्षण शुल्कामध्ये वाढ झाल्याने शिक्षणासाठी पैसा नाही, विकण्यासाठी काही नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाने मुलीप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत करावे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला अडीच वर्षे झाली, पण एकही कर्मचारी नाही, अशासकीय सदस्याची नियुक्ती नाही. निवडणुकीच्या आधी सरकारने परशुराम महामंडळ घेऊन घोषणा केली. या महामंडळाचा फायदा फक्त सात ते आठ जणांना झाला. एखाद्या प्रभागाला पाच कोटींचा निधी दिला जातो, तेवढाच निधी या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला दिला. महामंडळातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.
One thought on “मनोज जरांगे उपोषणावर ठाम; ब्राह्मण समाजाचे नेतेही उपोषणाच्या तयारीत…”