राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ पवार राज्यसभेवर?

Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी राजकीय खलबते सुरू असून मुंबई आणि बारामतीमध्ये एकाच वेळी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे पार्थ पवार हे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांशी महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित असल्याची माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून हा राजीनामा त्या राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर आजच दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे, आज संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा शपथविधी अत्यंत संक्षिप्त असून अवघ्या दहा मिनिटांत पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. पार्थ पवार यांचे नाव राज्यसभेच्या खासदारकीसाठी जवळपास निश्चित मानले जात असून, यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांची देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचे समोर येत आहे.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करत असल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.या संपूर्ण घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठा निर्णायक टप्पा येण्याची चिन्हे असून, लवकरच राजकीय गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *