न्यूयॉर्कः पश्चिम त्रिपुरातील लोकसभेतील खासदार बिप्लब कुमार देब यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ओआयसीवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवादासाठी खरा जबाबदार कोण आणि त्याचा बळी कोण आहे, हे ठरवण्यासही ओआयसीचे अध्यक्ष असमर्थ आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
भारताने संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) सहाव्या समितीच्या बैठकीत ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनला (ओआयसी) फटकारले असून, पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर भारताने केलेल्या निर्णायक कारवाईवर, ओआयसीने केलेली टिप्पणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
देब यांनी सांगितले की, ओआयसी अध्यक्ष हे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर भारताने केलेल्या कारवाईवर भाष्य करत होते. भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि मार्गदर्शन याच केंद्रांमधून करण्यात आले होते.
पाकिस्तानचा अवैध ताबा आणि मानवाधिकार उल्लंघनांवर, विशेषतः रावळकोटसारख्या भागांमधील उल्लंघनांवर ओआयसीने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगून बिप्लब कुमार देब म्हणाले की, ओआयसीच्या वतीने वक्तव्ये करणारे लोक हे देखील ठरवू शकत नाहीत, की दहशतवादासाठी खरा जबाबदार कोण आहे आणि त्याचा बळी कोण ठरला आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
रावळकोटमध्ये क्रूर हत्या, हिंसाचार आणि लोकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे ओआयसीने जाणीवपूर्वक डोळेझाक करणे हे केवळ त्यांचा कट्टरपणा दर्शवते, यावर देब यांनी जोर दिला.
आपल्या भाषणात, ते पुढे म्हणाले, की सीमापार दहशतवादाला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे. एप्रिल २०२५ च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला एक पूर्वनियोजित हल्ला होता, जो पश्चिम सीमेपलीकडून सरकारी आश्रय, सुरक्षित आश्रयस्थान आणि रसद पुरवठा मिळालेल्या नेटवर्कद्वारे करण्यात आला होता.