मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतरही पक्षांतराचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता. आता निवडणुका संपल्यानंतरही पक्षप्रवेश सुरूच असून आज शिवसेनात मोठा पक्षप्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोण-कोणाचा प्रवेश?
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये बिलोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, माजी उपाध्यक्ष आनंद गुडमलवार, माजी नगराध्यक्ष देवंण्णा तोंदरोड, चक्रधर पाटील, साईनाथ हंगरगे, नामदेव पाटील देगावकर, अॅड. अंकुशराजे जाधव, जेजेराव शिंदे, शहाजी बाबरे, सुरेश येलबुगडे, डॉ. सुनील जाधव, सतीश धाने आणि विठ्ठल कोकणे यांचा समावेश आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे गावचे सरपंच व माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज पानसंबळ यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्याला बालाजी पाटील खतगावकर, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील, तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
आगामी निवडणुकांवर परिणाम?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि मनसे या पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये या पक्षप्रवेशाचा फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.