दोन्ही शिवसेना एकत्र येणार! गुलाबराव पाटलांचे मोठे संकेत

Share

मुंबई: 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडले. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद अद्यापही शिगेला पोहोचलेले असतानाच, दोन्ही शिवसेना भविष्यात एकत्र येतील का, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. “आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. कोण कधी कुणासोबत जाईल, हे सांगता येत नाही,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.

राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे सांगत त्यांनी एमआयएमच्या युतींचे उदाहरण दिले. “शिवसेना एकत्र येतील का, याबाबत काहीही शक्यता नाकारता येत नाही,” असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.

केडीएमसीतील शिंदेसेना–मनसे युतीवर प्रतिक्रिया

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. “प्रत्येकाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. कोणती भूमिका घेतल्याने फायदा होईल, हा राज ठाकरे यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.

स्थानिक राजकारणावर मिश्किल टिप्पणी

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मिश्किल टोला लगावला. “आता काहीही होत आहे. अंबरनाथमध्ये 11 नगरसेवक आज आले आणि हळद फिटत नाही तोच दुसरा नवरदेव पकडला, अशी परिस्थिती आहे,” असे ते म्हणाले.

राजकारणात कोणीही स्पृश्य किंवा अस्पृश्य नसतो. सत्ता स्थापनेसाठी कोणतीही समीकरणे जुळू शकतात, असे सांगत गुलाबराव पाटील यांनी राज्याच्या राजकारणातील बदलत्या स्थितीवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *