मुंबई: महाराष्ट्र भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ‘पर्यायी नेतृत्व’ प्रयोगाला अखेर ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी आणि वंजारी समाजाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, हा मोठा प्रश्न होता. नैसर्गिक वारस म्हणून पंकजा मुंडे पुढे आल्या; मात्र पक्षातील काही रणनीतीकारांनी त्यांना थेट बळ न देता पर्याय उभा करण्याची भूमिका घेतली.
कराडांना संधी, मुंडेंना प्रतीक्षा
पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा असताना भाजपने वंजारी समाजातीलच रमेश कराड यांना विधान परिषदेत पाठवले. त्यानंतर राज्यसभेसाठी भागवत कराड यांची निवड झाली.विशेष म्हणजे, भागवत कराड यांना केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद देत राष्ट्रीय स्तरावर पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. हा संपूर्ण प्रयोग पंकजा मुंडे यांना पर्याय तयार करण्यासाठी असल्याची चर्चा त्या काळात रंगली होती.
सामाजिक स्वीकार कुणाला?
गोपीनाथ मुंडे यांचा ओबीसी समाजावर असलेला प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या राजकीय वारशाचा स्वीकार पंकजा मुंडे यांनाच अधिक प्रमाणात मिळाल्याचे राजकीय घडामोडींमधून दिसून आले.रमेश कराड यांचा प्रभाव लातूरपुरता मर्यादित राहिला, तर भागवत कराड यांना मंत्रीपद असूनही व्यापक जनाधार निर्माण करता आला नाही. संघटनात्मक पातळीवरही त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे स्थानिक निवडणुकांमध्ये दिसून आले.
मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला. “ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण” या मागणीमुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण झाला.या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतृत्व पुन्हा चर्चेत आले. छगन भुजबळ यांचाही प्रभाव मराठवाड्यात अपेक्षेइतका वाढला नाही. मात्र ओबीसी आणि वंजारी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले.
लोकसभा पराभवानंतर बदललेले चित्र
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अल्प फरकाने पराभव झाला. तरीही त्यांचा सामाजिक आधार कायम असल्याचे चित्र समोर आले.लोकसभा निकालानंतर भाजपने रणनीतीत बदल करत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान दिले. विधान परिषदेत संधी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले.
राज्यसभा संधीवर अनिश्चितता
दरम्यान, भागवत कराड यांची राज्यसभेवरील मुदत संपत आल्याने त्यांना पुन्हा संधी मिळेल का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यायी नेतृत्वाचा प्रयोग अपेक्षित परिणाम देऊ शकला नसल्याची भावना पक्षात असल्याचे बोलले जाते.
पंकजा मुंडे यांना बाजूला ठेवून कराड यांच्या माध्यमातून उभे केलेले पर्यायी नेतृत्व समाजमान्यता मिळवण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ओबीसी आणि वंजारी समाजातील राजकीय नाळ अजूनही पंकजा मुंडे यांच्याशी जोडलेली असल्याने भाजपला पुन्हा त्यांच्यावरच भर द्यावा लागत असल्याची चर्चा आहे.राज्यसभेच्या पुढील निर्णयातून भाजपची खरी रणनीती स्पष्ट होणार आहे.