नवी दिल्लीः दिल्लीतील आंदोलने आणि राजकीय सभांमुळे विविध प्रकारच्या व्यवसायिकांवर झालेला आर्थिक परिणाम, आता सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) यांच्यासह इतर पक्षांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (सीटीआय) न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, व्यापाऱ्यांच्या चिंता ऐकून घेतल्या जातील हे सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
किराणा समिती आणि दिल्ली आयर्न अँड हार्डवेअर मर्चंट्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांच्या ११ ऑक्टोबरच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे, ज्यानुसार रामलीला मैदान हे आंदोलन आणि निदर्शनांसाठीचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी असा युक्तिवाद केला आहे, की राजधानीतील दीर्घकाळ चालणारी आंदोलने आणि मोठ्या राजकीय सभांमुळे केवळ त्या ठिकाणच्याच नव्हे, तर शेजारच्या बाजारपेठांमधील व्यवसायावरही परिणाम होतो.
सीटीआयचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांच्या म्हणण्यानुसार, जंतर मंतरवरील सततच्या आंदोलनांमुळे दिल्लीत सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला, तर रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीमुळे अंदाजे ११ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशा घटनांमुळे मध्य दिल्लीतील कनॉट प्लेस, पालिका बाजार, जनपथ, चावडी बाजार, सदर बाजार, चांदनी चौक, करोल बाग, पहाडगंज, दर्यागंज आणि कमला मार्केट यांसह अनेक बाजारपेठांमधील व्यावसायिक व्यवहारांमध्ये व्यत्यय येतो, असा दावा गोयल यांनी केा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाचे स्वागत करताना गोयल म्हणाले, की व्यापाऱ्यांचा आंदोलन करण्याच्या अधिकाराला विरोध नाही, परंतु त्यांचा व्यवसाय करण्याचा आणि उपजीविका कमावण्याचा अधिकारही संरक्षित करणे आवश्यक आहे. निदर्शने आणि राजकीय सभांमुळे व्यापाऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास आयोजकांना जबाबदार धरावे, अशी मागणी सीटीआयने केली आहे. तसेच, कनॉट प्लेस, जंतर मंतर आणि रामलीला मैदान यांना आंदोलन-मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणीही केली आहे.
आंदोलनांवर सरसकट बंदी घालण्याऐवजी, संघटनेने अशा कार्यक्रमांसाठी स्पष्ट नियमांची मागणी केली आहे. यामध्ये निदर्शनांचा कालावधी आणि गर्दीच्या आकारावर मर्यादा घालणे, वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे बाजारपेठा आणि रुग्णालयांपर्यंत पोचण्यास अडथळा येणार नाही याची खात्री करणे आणि व्यावसायिक नुकसानीसाठी जबाबदारी निश्चित करणे यांचा समावेश आहे.
गोयल म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या अधिकाराचे संरक्षण करणे आवश्यक असले तरी, इतर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचेही रक्षण करणे गरजेचे आहे, त्यामुळे या दोन्हींमध्ये संतुलन साधणे अत्यावश्यक आहे.
गरज भासल्यास व्यापारी आणि दुकानदारांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यास तयार असल्याचे सीटीआयने म्हटले आहे. व्यापारी आता २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत.