मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचा मी कधीच अनादर करू शकत नाही. पण काल माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केला. असे असले तरी शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांची मी माफी मागते, असे स्पष्टीकरण शिंदेसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी दिले आहे. त्याचवेळी सत्तेसाठी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत, असा हल्लाबोल त्यांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांवर केला.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून शिंदेसेनेच्या सहा प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रवक्त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील काही पाने फाडली. त्याचवेळी अतिउत्साहात प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. त्यांच्या या कृत्यावर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. आजही राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता असताना खबरदारी म्हणून शायना एनसी यांनी आज (गुरुवार) सकाळीच जाहीर माफी मागितली.
View this post on Instagram
काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते. बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे.
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते. बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते.
पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना थांबल्या अन् चावली जीभ…