नेतान्याहू की आयझेनकोट; सरकार स्थापनेबाबत इस्राएलचे अध्यक्ष रविवारी कोणत्या पक्षाला आमंत्रित करणार?

Share

तेल अवीव: इस्राएलमधील नवीन सरकार स्थापन करणाऱ्या नेत्याच्या नावाची घोषणा, इस्राएलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग येत्या रविवारी करणार आहेत. निवडून आलेल्या गटांसोबत झालेल्या दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी हे विधान केले. बैठकांनंतर अध्यक्ष हर्झोग म्हणाले, की ६७ खासदारांनी विरोधी पक्ष याशर पार्टीचे नेते गादी आयझेनकोट यांच्या नावाला पाठिंबा दिला, तर ४६ खासदारांच्या गटाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नावाची शिफारस केली आहे.

१२० सदस्यांच्या कनेसेटमध्ये बहुमतासाठी ६१ सदस्यांची आवश्यकता असते. ६७ खासदारांच्या पाठिंब्याने आयझेनकोट यांनी पुढील सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तथापि, रविवारी जनादेश सुपूर्द करण्यापूर्वी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी अधिक चर्चा करणार असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

याशर पार्टीने राष्ट्रपतींना लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यासाठी आयझेनकोट यांची नियुक्ती करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाने म्हटले आहे, की ६७ सदस्यांचा पाठिंबा हा २०१५ पासून कोणत्याही उमेदवाराला मिळालेला सर्वांत मोठा पाठिंबा आहे. तथापि, हर्झोग म्हणाले की, केवळ संख्याबळावरून कोणत्या उमेदवाराला आघाडीचे सरकार स्थापन करण्याची सर्वोत्तम संधी आहे, हे ठरवता येणार नाही.

राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर एका निवेदनात हर्झोग म्हणाले, की निवडणुकीचे निकाल स्पष्ट दिसत असले, तरी वेगवेगळ्या गटांमध्ये आणि गटांतर्गतच परस्पर नकाराधिकाराची परिस्थिती असल्याने सरकार कोण स्थापन करू शकेल हे ठरवणे कठीण झाले आहे.

विरोधी ज्यू आघाडीचे नेते गादी आयझेनकोट यांनी सरकार स्थापन करण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ दिले आहे, कारण ‘जॉइंट लिस्ट’ या अरब पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘रा’आम’ या दुसऱ्या अरब पक्षाने यापूर्वीच आयझेनकोट यांना पाठिंबा जाहीर केला होता. इस्राएली संसदेत दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १९ सदस्य आहेत.

आयझेनकोट यांचा मार्ग अवघडच

अरब पक्षांचा पाठिंबा असूनही, आयझेनकोट यांना आघाडी स्थापन करणे अवघड जाईल. नेतान्याहूंचा पक्ष दोन गटांमध्ये विभागलेला आहे. एका बाजूला ज्यू नेत्यांच्या नेतृत्वाखालील ४८ खासदारांचा चार-पक्षीय गट आहे, तर दुसऱ्या बाजूला अरब नेत्यांच्या नेतृत्वाखालील दोन गट आहेत. जरी सर्व सहा पक्षांनी आयझेनकोट यांना पंतप्रधानपदी शिफारस केली असली तरी, अरब पक्षांसोबतच्या आघाडीबाबत त्यांच्यात मतभेद आहेत. ज्यूंच्या नेतृत्वाखालील गटातील तीन पक्ष अरब पक्षांसोबत युती करण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!