नवी दिल्ली: युरोपियन युनियनसोबत (ईयू) एका महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर (एफटीए), भारत पुढील महिन्यात स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहे. तथापि, हवामान बदलाच्या मुद्द्यांवरील आपल्या भूमिकेवरून भारत मागे हटणार नाही. तुर्कीमध्ये होणाऱ्या आगामी संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेच्या (सीओपी ३१) पार्श्वभूमीवर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की भारत ‘ईयू’च्या कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझमसह (सीबीएएम) सर्व व्यापार आणि खर्चाशी संबंधित निर्बंधांना विरोध करेल.
ते म्हणाले की, कार्बन बाजारांमधील सहभाग ऐच्छिक असावा. ते म्हणाले की, भारत आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी ‘सीबीएएम’ विरोधात आवाज उठवत राहील.
जागतिक हवामान परिषदेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना यादव म्हणाले, की खर्च, बौद्धिक संपदा हक्क आणि व्यापार यांच्याशी संबंधित अडथळे दूर केले पाहिजेत. अशा निर्बंधांमुळे लहान आणि विकसनशील देशांना सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागते.
यादव म्हणाले, की कार्बन मार्केटमधील सहभाग ऐच्छिकच राहिला पाहिजे. ‘सीबीएएम’बाबत भारताची पूर्वीची भूमिका कायम असेल. भारताच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा हा मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडण्याची भारताची भूमिका आहे.
युरोपियन युनियनची कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम जानेवारी २०२७ मध्ये अंमलात येणार आहे. याअंतर्गत, युरोपियन युनियनमध्ये आयात होणाऱ्या विशिष्ट उत्पादनांवर, उत्पादनादरम्यान निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या आधारावर कर आकारला जातो. आयात केलेल्या वस्तूंवर कार्बन उत्सर्जन शुल्क लावणे आणि कमी कठोर कार्बन उत्सर्जन नियम असलेल्या देशांतील कंपन्यांशी स्पर्धा करताना युरोपियन कंपन्यांना कोणताही अन्यायकारक तोटा होऊ नये, हे सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे.
तथापि, भारतासह अनेक विकसनशील देशांना भीती आहे की, या यंत्रणेमुळे त्यांच्या निर्यातीवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. लोह आणि पोलाद, खते, हायड्रोजन, वीज, सिमेंट आणि ॲल्युमिनियम यांसारख्या क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ शकतो.
‘सीओपी ३१’ मध्ये युरोपियन युनियन आणि विकसनशील देशांमध्ये ‘सीबीएएम’ हा संघर्षाचा एक प्रमुख मुद्दा बनू शकतो. जी ७७ आणि ‘बीएएसआयसी’ गटांसह विकसनशील देशांनी यापूर्वी एकतर्फी व्यापार निर्बंध, हवामान वित्तपुरवठा आणि न्याय्य ऊर्जा संक्रमणाशी संबंधित मुद्दे उपस्थित केले आहेत. भारत या तिन्ही गटांचा सदस्य आहे. युरोपियन आयोग १७ नोव्हेंबर रोजी ‘सीओपी ३१’ मध्ये ‘सीबीएएम’वर एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित करणार आहे. त्याचे शीर्षक आहे ‘ईयू सीबीएएम’ची सद्यस्थिती: ‘सीबीएएम’च्या यशाचे रहस्य काय?’
परिषदेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्वच्छ ऊर्जा आणि विजेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव असू शकतो. ‘सीओपी ३१’चे यजमानपद भूषवणारा तुर्की देश, २०३५ पर्यंत जागतिक ऊर्जा वापरामध्ये विजेचा वाटा सध्याच्या २३ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या विजेच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जातो. तथापि, भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, ‘सीओपी ३१’च्या अध्यक्षपदाशी संबंधित ऐच्छिक उपक्रम औपचारिक वाटाघाटींपासून वेगळे ठेवले पाहिजेत. कोणतेही जागतिक ध्येय निश्चित करताना, प्रत्येक देशाची परिस्थिती आणि गरजा विचारात घेणे महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी जोर दिला.
संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ९ ते २० नोव्हेंबर दरम्यान तुर्कीमधील अंताल्या येथे आयोजित करण्यात आली आहे. तुर्की या परिषदेचे यजमानपद भूषवेल आणि अध्यक्षस्थानही सांभाळेल, तर ऑस्ट्रेलिया वाटाघाटींचे अध्यक्षपद स्वीकारेल. या परिषदेत भारत आणि स्वीडन यांच्यातील ‘लीडआयटी ३.०’ उपक्रम, किनारी भागांचे हवामान संरक्षण, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आणि जंगले यांसारख्या उच्चस्तरीय कार्यक्रमांचाही समावेश असेल.