प्रकृती खालावल्यामुळे एमपीएससी आंदोलकांपैकी तिघांजणांचे उपोषण मागे

Share

पुणे: पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावल्याने, त्यांनी अखेर गुरुवारी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सलग नवव्या दिवशीही चालू आहे. सलगच्या अन्नत्यागामुळे प्रकृती चिंताजनक बनलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून, ज्येष्ठांच्या आवाहनानुसार शुक्रवारी हे उपोषण मागे घेण्यात आले असले, तरी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी काल आंदोलनस्थळी दाखल होऊन एस. एम. जोशी पूल तातडीने मोकळा करण्याच्या सूचना आंदोलकांना दिल्या आहेत. पोलीस व्हॅनमधून वारंवार अनाउन्समेंट करून आंदोलकांना परिसर खाली करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर विद्यार्थी अजूनही ठाम आहेत. आमदार रोहित पवार स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित असल्याने या परिस्थितीतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

या सर्व घडामोडींवर बोलताना रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि लोकसेवा आयोगावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी हा सत्याग्रह असाच सुरू राहील. एमपीएसचीचे अध्यक्ष विवेक भीमनवार या भ्रष्ट अध्यक्षांची आपण विकेट घेत नाही, तोपर्यंत या आंदोलनाची सांगता होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हा लढा येणाऱ्या काळात अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

One thought on “प्रकृती खालावल्यामुळे एमपीएससी आंदोलकांपैकी तिघांजणांचे उपोषण मागे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!