पुणे: बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीतून बंडाचे निशाण उभारलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, अजितदादांचे नाव न वापरता स्वतःच्या जिवावर निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले होते.
माध्यमांपुढे या आव्हानाला प्रत्युत्तर देताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, कारखान्याच्या विकासाच्या आणि सभासदांच्या हिताच्या मुद्द्यावरूनच आम्ही बाहेर पडलो आहोत. अजितदादांची गणना ही महापुरुषांमध्ये केली जाते. त्यामुळे मी अजित पवारांचे नाव वापरणारच. सुनेत्राताई अजितदादांना सभासदांच्या मनातून आणि हृदयातून कसे बाहेर काढणार?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या लेटरहेडवर एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये, अजित पवार यांच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करण्यापूर्वी कुटुंबीयांची रीतसर परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या या आवाहनानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी वानेवाडी येथील आपल्या प्रचार मेळाव्यात लावलेला अजित पवारांचा फ्लेक्स काढून टाकला.
फोटो हटवल्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात जगताप म्हणाले, की अजितदादा सभासदांच्या मनात आणि आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे फोटो लावला किंवा नाही लावला, तरी काहीही फरक पडत नाही.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर (३० सप्टेंबर) आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे:
एकूण दाखल अर्ज ६०१
छाननीत पात्र ठरलेले अर्ज ५१४
माघार घेतलेले उमेदवार ४३१
प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवार ८३
तब्बल ४३१ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ८३ उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष सामना रंगणार आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे, तर युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली एक आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक, असे एकूण तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीनही पॅनलनी आपापल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.