एसआयआर मोहिमेच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत रविवारी संयुक्त मोर्चा निघणार

Share

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष काँग्रेसने रणशिंग फुंकले असतानाच, आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी मंगळवारी निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता भायखळा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाईल. महापालिका मुख्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. मोर्चानंतरच्या सभेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत सविस्तर भूमिका मांडली जाईल. हा लढा फक्त राजकीय पक्षांचा नाही तर जनतेचादेखील आहे. त्यामुळे जनतेनेही या मोर्च्यात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर २०१७-१८ पासून आपण विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या असून या संदर्भातील सर्व मुद्दे मोर्चात सविस्तर मांडणार आहोत. हा निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षातील लोकांनाही या आंदोलनात सहभागी व्हायचे असल्यास तेदेखील येऊ शकतात, असे सांगत मोर्चासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना औपचारिक पत्र देण्याऐवजी फोनवरून संपर्क साधून निमंत्रण दिले जाणार आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय असल्याने मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा असणार नाही. सर्वांच्या हातात तिरंगाच असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षाला त्यांच्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राज ठाकरे यांनी भाजपवर टोलेबाजी केली. मराठीमध्ये एक म्हण आहे…खाई त्याला खवखवे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर प्रहार केला.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत २ ऑक्टोबरला होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. यापूर्वी जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनालाही पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही वाचवण्यासाठी जे लोक आंदोलन करतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक आंदोलनात प्रत्येकाने प्रत्यक्ष सहभागी होण्याची आवश्यकता नसून, वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ४ ऑक्टोबरनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!