रत्नागिरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण कधीही देणार नाहीत. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना पुढे करून ते शब्द द्यायला लावतात आणि नंतर तो शब्द पूर्ण करत नाहीत. ते मराठाद्वष्टे आहेत, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे हे पुन्हा आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यावर भास्कर जाधव प्रतिक्रिया देत होते.
सरकारमधील कुठल्याच नेत्यावर आता जरांगे पाटील यांचा विश्वास राहिला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महायुती सरकारच जबाबदार आहे, असे सांगून ते म्हणाले, की मुख्यमंत्री हे मराठा आणि मराठीद्वेष्टे आहेत. प्रत्येक वेळी ते नवीन जीआर काढून जरांगे पाटील यांना उपोषण सोडायाला लावून विश्वासघात करतात. यामुळे जरांगे पाटील उद्विग्न झाले आहेत.
जाधव पुढे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या सगळ्या क्षेत्रात दादागिरी सुरु आहे. ‘हम करे सो कायदा’ असा प्रकार त्यांनी राज्यात सुरु केला आहे. ते मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत. मराठी भाषेचा भाजपला किती तिरस्कार आहे आणि मराठी भाषेच्या विरोधात त्यांची काय भूमिका आहे याचे हे उदाहरण आहे.
भारतीय जनता पार्टीला आता त्यांचे मित्रपक्ष ओझे वाटू लागले आहेत. त्यांना आता मित्र नको आहेत, त्यांना केवळ सत्ता पाहिजे, अशी टीकाही जाधव यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. इकडे उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकारकडून कोणतीही ठोस चर्चा झाली नाही. यामुळे मनोज जरांगेंनी मराठा समाजाला मुंबईकडे कूच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मराठा समाजाने १२ तारखेपर्यंत मुंबईला जाण्याच्या सूचना जरांगेंनी दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी एकत्र जाण्याऐवजी स्वतंत्रपणे जावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.