मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत मोर्चा निघणार आहे. मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिकांनी काढलेला मोर्चा असणार आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. सगळ्याच राजकीय पक्षांना या मोर्चाचे निमंत्रण दिले जाणार आहे, अगदी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही मोर्चाला यावे, असेही राज ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू यांनी एल्गार पुकारला आहे. ४ तारखेला भायखळ्याच्या रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीसमोरून हा मोर्चा निघणार आहे. रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चा असणार आहे.
सकाळी अकरा वाजता मोर्चा सुरू होईल, नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत होईल. मोर्चामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. सगळ्यांच्या हातात तिरंगा असेल. कारण शेवटी लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
View this post on Instagram
पत्रकार परिषदेत मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “चार तारखेला हा संयुक्त मोर्चा निघेल. भायखळा वरून हा मोर्चा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथे व्यासपीठ असेल आणि तिथे त्याचे रूपांतर सभेमध्ये होईल. सकाळी दहा वाजताची वेळ आहे. मोर्चात काय बोलायचे ते आम्ही बोलू. परंतु, हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे. गेली अनेक वर्ष या विषयांवर आम्ही बोलत आलोय. 2017-18 मध्ये मी अनेक नेत्यांना या संदर्भात भेटलो होतो. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात मी भेटलो होतो, या विषयावर सविस्तर बोलणं चार तारखेला होईल.”
या मोर्चात पक्षीय राजकारण नसेल हे स्पष्ट करत राज ठाकरे पुढे म्हणाले, “या मोर्चानंतर त्याची पुढील रूपरेषा आम्ही ठरवू. आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांना व्यासपीठावर यायचं असेल तर ते देखील येऊ शकतात. निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षातला जो कारभार आहे त्या विरोधात हा मोर्चा आहे. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. यात सर्वांच्या हातात तिरंगाच असणार आहे. हा विषय या देशातील लोकशाही वाचवण्याचा आणि संविधान वाचवण्याचा आहे. त्यामुळे सर्वांच्या हातात तिरंगाच असेल.”
‘विरोधी पक्षाला त्यांच्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर सोडायचे आहे’, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, राज ठाकरे यांनी अतिशय मार्मिक आणि एका वाक्यात टोला लगावला. राज ठाकरे म्हणाले की, “मराठीमध्ये एक म्हण आहे खाई त्याला खवखवे”, असे म्हणत त्यांनी भाजपचा विषय एका वाक्यात संपवला.
राहुल गांधींचा चोरीस गेलेल्या मेंदूच्या शोधासाठी पंतप्रधानांनी समिती स्थापन करावी; देवेंद्र फडणवीस
ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरुद्ध एल्गार; भव्य मोर्चा काढणार, तारीखही ठरली…
ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाहीविरुद्ध निवडणूक आयोगातच बंड; संजय राऊत यांचा दावा