‘गाव विकणे आहे’; पाण्यासाठी हताश शेतकऱ्यांने सोलापूर जिल्ह्यातील तुळशी गावात लावले पोस्टर

Share

सोलापूर: दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी या वर्षीही पावसाअभावी हताश झाले आहेत. सिंचनासाठी कालव्यातून पाण्याची पूर्तता करू, असे आश्वासन सरकारने अनेक दशकांपूर्वी दिले होते. मात्र, इतकी वर्षे प्रतीक्षा करूनही आश्वासनांची पूर्तता न झाल्याने, उद्वेगाने शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील तुळशी हे संपूर्ण गावच विकायला काढले आहे.

शेतीवरच अवलंबून असलेल्या या गावातील शेतकऱ्यांनी गावाबाहेर एक सूचनाफलक लावलेला असून, त्यावर ‘बिक्री के लिए! पूरा सोलापूर गाव और कृषी भूमी’, असा मथळा दिला आहे.अनेक दशकांपासून सिंचनाच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या रहिवाशांची संताप, उद्वेग आणि तीव्र चिंता उघड झाली आहे.

यासंदर्भात सरपंच शरद मोरे म्हणाले, की ज्याला आमचे गाव विकत घ्यायचे असेल, ते पुढे येऊ शकतात. हा सूचना फलक बाहेरच्या लोकांसाठी कदाचित विनोदी वाटत असेल, पण गेल्या २५ वर्षांपासून सरकार आमची कशी फसवणूक करत आहे, हे यातून दिसून येते.

तुळशी गाव सीना-माढा उपसा सिंचन योजनेपासून फक्त ९ किलोमीटर अंतरावर आहे. ही योजना सन २००० मध्ये कार्यान्वित झाली, पण तुळशीला तिचा फायदा झालेला नाही. जवळपासची इतर गावे जास्त पाणी लागणारी नगदी पिके घेतात, तर तुळसी मात्र अनिश्चित पावसाच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहे.

जिल्ह्याच्या नोंदीनुसार, माढा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. तुळसी जलाशयात पाणी जवळजवळ नाहीच. विहिरी आणि पाझर तलाव कोरडे पडले आहेत. आम्हाला जुलैपासूनच टँकरमधून पिण्याचे पाणी मिळत आहे. मान्सून संपल्यानंतर सुमारे २,७०० हेक्टर शेतजमीन पडीक होऊ शकते, असे ते म्हणाले.

परिस्थिती इतकी गंभीर झाली की गावकऱ्यांनी गणेश चतुर्थीला अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. त्यांनी आत्मदहन करण्याची आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची धमकी देत ​​तहसीलदारांना एक निवेदन सादर केले. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर शुक्रवारी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले की, पाटबंधारे विभागाने तुळशी नदीचे जलशास्त्रीय सर्वेक्षण केले आहे. ते म्हणाले, या सर्वेक्षणाच्या निकालांच्या आधारे आम्ही राज्य सरकारला कालव्यांच्या जाळ्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!