आमच्या मागण्या मान्य करण्याशिवाय पर्याय नाही; अमेरिकेसोबतच्या शांततेची किंमत इराणने वाढविली

Share

तेहरानः जूनमधील करार अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेबरोबर चालू असलेल्या जवळपास सात महिन्यांचे युद्ध संपवण्यासाठी, इराणने आपल्या अटी अधिक कठोर केल्या आहेत. वॉशिंग्टनकडे आता तेहरानच्या मागण्या स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. असे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी येथे स्पष्ट केले.

तेहरानमध्ये एएफपीला दिलेल्या मुलाखतीत मोहेबी म्हणाले की, पूर्वीच्या सामंजस्य कराराचे उल्लंघन झाले असून, त्यामुळेच इराणने वाटाघाटींमध्ये परत येण्यासाठी किंमत वाढवली आहे. अमेरिकेने करार मोडला आणि आणखी एक घृणास्पद कृत्य केले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या अटी अधिक कठोर केल्या आहेत, असे सांगून मोहेबी पुढे म्हणाले, की जर वॉशिंग्टनने आपला सध्याचा मार्ग चालू ठेवला, तर ते केवळ स्वतःसाठीच गोष्टी कठीण करून घेतील.

आम्ही त्यांच्या हातातील खेळणे नाही, आणि त्यांनी स्वाक्षरी केलेला करार ते त्यांच्या मर्जीनुसार एकतर्फी मोडू शकत नाहीत. इराण आणि अमेरिका यांनी यापूर्वी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा मार्ग निश्चित करणाऱ्या एका सामंजस्य करारावर सहमती दर्शवली होती. या करारामध्ये अमेरिकेने लादलेले तेल निर्बंध हटविणे, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटविणे, परदेशातील इराणी मालमत्ता गोठवलेली स्थिती पूर्ववत करणे आणि लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लढाई थांबवणे या मागण्यांचा समावेश होता. नंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्याने हा करार रद्द झाला, असे ते म्हणाले.

मोहेबी म्हणाले, की इराण आता वाटाघाटींपूर्वी आणि वाटाघाटींदरम्यान टप्प्याटप्प्याने निधी मिळवण्याऐवजी, गोठविलेली संपूर्ण २४ अब्ज डॉलर्सची मालमत्ता एकदम मुक्त करण्याची मागणी करत आहे. तेहरानने येमेनसंदर्भात एक अशी मागणी जोडली आहे, जी जूनच्या सामंजस्य करारात नव्हती.

येमेनचा मुद्दा पूर्वीच्या कराराच्या अजेंड्यावर नव्हता. आता या करारामध्ये येमेनवरील नाकेबंदी उठवण्याचा समावेश करावा, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. ही मागणी, सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने एका दशकाहून अधिक काळापासून इराण-समर्थित हूतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या बंदरांवर आणि विमानतळांवर लादलेल्या निर्बंधांशी संबंधित आहे. हूतींनी अलीकडेच मोक्याच्या बाब अल-मंदाब सामुद्रधुनीच्या आसपासच्या भागांवर ताबा मिळविला आहे, ज्यामुळे या जलमार्गातून होणाऱ्या जलवाहतुकीबद्दल चिंता वाढली आहे. या गटाने सौदी बंदरांवर सागरी नाकेबंदीही जाहीर केली आहे.

हूती तेहरानच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप फेटाळून मोहेबी म्हणाले, की हूती हे स्वतःच निर्णय घेतात. त्यांना जगातील कोणत्याही गोष्टीसाठी आमच्याशी समन्वय साधण्याची गरज नाही. जरी मध्यपूर्वेतील युद्धाचा सर्वात तीव्र टप्पा ओसरला असला तरी, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास होणारे तुरळक हल्ले, तोडगा काढण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणत आहेत.

आखाती देशांमधून होणाऱ्या जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी हा जलमार्ग एक महत्त्वाचा मार्ग आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून, इराणने होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना आपल्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे बंधनकारक केले आहे, तर आखाती देशांनी या सामुद्रधुनीला वळसा घालण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घेतला आहे.

किमान पुढील २० वर्षांसाठी पर्शियन आखाताच्या सामुद्रधुनीला पर्याय असणार नाही. शेवटी, हा केवळ तेलाचाच प्रश्न नाही, असे मोहेबी म्हणाले आणि खतांसारख्या इतर अत्यावश्यक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी तिचे महत्त्व अधोरेखित केले.

या संघर्षात इराणचा विजय झाले आहे, असे सांगून ते म्हणाले, की इराणचा विश्वास आहे की आम्ही हे युद्ध जिंकले आहे आणि सध्या आम्ही त्या विजयाला एका संपूर्ण प्रतिबंधक शक्तीमध्ये रूपांतरित करत आहोत, असे ते म्हणाले. वॉशिंग्टनने तेहरानविरुद्ध ‘आर्थिक कोंडमारा’ मोहीम तीव्र केली असतानाच ही टिप्पणी आली आहे. अमेरिकेने इराणशी असलेल्या कथित संबंधांवरून परदेशी बँकांना लक्ष्य केले आहे आणि अलीकडेच इराणी विमान कंपन्यांवर अधिक कडक निर्बंध जाहीर केले आहेत.

आर्थिक नाकेबंदीमुळे आमचे नुकसान होत असले तरी, अमेरिका त्याद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही आणि आम्ही निःसंशयपणे प्रत्युत्तर देऊ असे सांगून, अमेरिकेने केलेल्या कोणत्याही नवीन हल्ल्यामुळे इराणकडून अधिक तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र त्याच वेळी तेहरानला हा संघर्ष वाढवायचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!