मॉस्कोः क्रेमलिनने शनिवारी (ता. ५) सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध कसे संपवावे, याबाबत अमेरिकी दूतांसोबत ‘अत्यंत स्पष्ट’ चर्चा केली असून, अमेरिकेने ‘अनेक कल्पना’ मांडल्या आहेत. अमेरिकी प्रतिनिधींनी या दौऱ्यासाठी कसून तयारी केली होती, असे क्रेमलिनचे प्रतिनिधी युरी उशाकोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दोन्ही देशांमधील युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेचे खास दूत रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी तात्पुरती यु्द्धबंदी जाहीर केली असून, त्याला प्रतिसाद म्हणून पुतिन यांनी कीएव्ह शहरावरील हल्ले ७२ तासांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेने संघर्ष लवकर संपवण्यासाठी केवळ इच्छा व्यक्त केली नाही, तर तोडगा काढण्यासाठी अनेक कल्पनाही मांडल्या, असे उशाकोव्ह यांनी सांगितले.
संभाषण रचनात्मक, अत्यंत स्पष्ट आणि विश्वासपूर्ण होते, असे सांगून ते म्हणाले, की रशियच्या बाजूने निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याबाबत विश्वास व्यक्त केला.