मुंबईः राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ अंतर्गत राज्याची नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यादीतून राज्यातील तब्बल २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सखोल पुनरीक्षणाची ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ नोंदणीकृत मतदार होते. नव्याने प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीत ७,७१,६५,५६२ (७८.८६%) मतदारांचाच समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे, गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे तब्बल २,०६,८८,४८७ (२१.१४%) मतदारांची नावे नव्या यादीत समाविष्ट झालेली नाहीत.
नव्या प्रारुप यादीत पुरुष मतदारांची संख्या ३,९५,८९,९०५ इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या ३,७५,७२,५७० इतकी नोंदवण्यात आली आहे. याशिवाय ३,०९७ तृतीयपंथी मतदारांचा यादीत समावेश आहे. मतदार यादीतील नाव सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे आता प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
वगळण्यात आलेल्या किंवा नवीन नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी आणि दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर सर्व अर्जांची छाननी करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदारही यासाठी पात्र ठरणार आहेत.
या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरणही करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यात १,००,२५३ मतदान केंद्रे होती, त्यातील ४३१ केंद्रे कमी करून व ३९४ नवीन केंद्रे जोडल्यामुळे आता एकूण १,००,२१६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
मतदारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने १,४०३ मतदान केंद्रांचे स्थळ बदलण्यात आले असून, त्यांना तात्पुरत्या रचनेवरून पक्क्या आणि सुरक्षित इमारतींमध्ये हलवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि मतदान केंद्र तपासून घेणे गरजेचे आहे.