पुणेः शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या मुख्याधापकांच्या कार्यालयात, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या एका कार्यकर्त्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोदी यांचा फोटो का लावला, असे मुख्याधापकांना विचारले. पुढच्याच क्षणी कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा फोटो खाली उतरवला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावरुन पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी आलेले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा पुणे दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. तेथे ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्टस कोट्यातली खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला.
अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्याच्या कृतीचे समर्थन केले. ते म्हणाले, की एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावल्याचे आपल्या लक्षात आणून दिले. मोदींना एवढ्या उंचीवर नेऊन ठेऊ नका. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल, तर तो अन्य ठिकाणी लावण्यात यावा. छत्रपती शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? असे निषेध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा. आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही. उद्या तुम्ही देवघरात मोदींचा फोटो लावाल. मोदी आणि शिवरायांचा फोटो बाजूला लावण्याच्या निर्णयाचे समर्थन भाजपचे नेते तरी करणार आहेत का, असा प्रतिप्रश्न अमित ठाकरे यांनी विचारला.
अमित ठाकरे पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेटी देऊन जेन-झी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित विविध अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’, वाडिया महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसमोर सर्रासपणे होणाऱ्या सिगारेट व गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी, तसेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन, अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, तो फोटो नरेंद्र मोदींचा नसून तो भारताच्या पंतप्रधानांचा आहे. प्रोटोकॉनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात पंतप्रधान, राष्ट्रपतींचे फोटो लावणे हे बंधनकारक असते. कदाचित अमित ठाकरेंना प्रोटोकॉल म्हणजे काय याची माहिती नसावी. ते देशाच्या पंतप्रधानांना मानत नसतील. त्यांच्या या कृत्याचा मी निषेध करतो. पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. ते कुठल्या पक्षाचे नसतात, देशाचे पंतप्रधान असतात, असे पुणे महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी तीव्र निषेध व्यक्त करताना सांगितले.