राज्यसभा रणधुमाळीत महाराष्ट्रात पवारांचे नाव आघाडीवर; १६ मार्चला निवडणूक

Share

मुंबई: देशासह राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील संभाव्य जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणा येथे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील एकमेव संभाव्य जागेसाठी महाविकास आघाडीकडून पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जवळपास पक्का मानला जात आहे.

राज्यसभेतील सात जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च असून निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही पार पडणार आहे. एप्रिलमध्ये शरद पवार , प्रियांका चतुरवेदी , रामदास आठवले , भागवत कराड आणि रजनी पाटील यांसह काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.

या जागेबाबत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये दावेदारीची चर्चा रंगली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनी १६ मार्चच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्याच्या आमदारसंख्येनुसार ठाकरे गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि पवार गटाकडे १० आमदार आहेत. दुसरीकडे महायुती सातपैकी सहा जागा जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे राजकीय गणित सांगते. भारतीय जनता पार्टी कडून विजया राहत्कार आणि विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही भाजप कोट्यातून पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *