भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची जम्बो कार्यकारिणी जाहीर; पराभूत, नाराज आणि आयात नेत्यांना संधी

Share

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आठ महिन्यांनी अखेर नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीस आणि विविध विभागांचे अध्यक्ष अशा जवळपास 43 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे.

कार्यकारिणीतील नावांवरून पक्षाने नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणुकीत पराभूत झालेले, मंत्रिपद नाकारले गेलेले तसेच आयात आणि निष्ठावंत नेत्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या यादीतून दिसून येतो.

पराभूत नेत्यांचे पुनर्वसन

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुजय विखे पाटील , रामदास तडस आणि भारती पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अर्चना चाकूरकर यांनाही उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तसेच राम सातपुते यांच्याकडे चिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मंत्रिपद नाकारलेल्या आमदारांना संधी

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. अशा नेत्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

निरंजन दवाखारे , योगेश सागर आणि संजय कुटे यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे.

तर प्रशांत ठाकूर , मंगेश चव्हाण आणि परिणय फुके यांची चिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे.

मिहीर कोटेचा यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयात आणि निष्ठावंतांमध्ये समतोल

कार्यकारिणीत आयात आणि दीर्घकाळ पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते. केशव उपाध्ये, प्रवीण पोटे , माधवी नाईक , राजेश पांडे , सुनील राणे आणि योगेश टिळेकर यांसारख्या निष्ठावंत चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

तसेच बाहेरून आलेल्या गोपीचंद पडळकर , कृष्णाराज महाडिक आणि चित्रा वाघ यांनाही महत्त्वाची संधी देण्यात आली आहे.

दोनवेळा प्रस्ताव परत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नावांवरील एकमत आणि इतर कारणांमुळे कार्यकारिणी जाहीर होण्यास विलंब झाला होता. नव्या कार्यकारिणीचा प्रस्ताव दोनदा दिल्लीतून दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आल्याची माहिती आहे. अखेर केंद्रीय नेतृत्वाने मंजुरी दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नव्या चेहऱ्यांना संधी देत संघटनात्मक बळकटीसाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *