महायुतीत जागावाटप ठरलं; भाजपच्या चार जागांसाठी जोरदार रस्सीखेच

Share

मुंबई: राज्यसभेतील सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. महायुतीत जागावाटप जवळपास निश्चित झाले असून भाजपला चार, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वच पक्षांत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा येथे बैठक

मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सुमारे १२ वरिष्ठ नेते उपस्थित होते.

बैठकीत सुमारे १० ते १२ नावांवर विचारमंथन झाले असून काही नावांवर प्राथमिक सहमती झाल्याची चर्चा आहे. अंतिम प्रस्ताव दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

संभाव्य उमेदवारांमध्ये ‘ही’ नावे चर्चेत

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांमध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रितम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत असल्याने मित्रपक्षाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रितम मुंडे यांचे नावही आघाडीवर असल्याची चर्चा आहे. भागवत कराड यांचाही कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांना पुनर्नियुक्ती मिळते का, याकडे लक्ष लागले आहे.

याशिवाय लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या रावसाहेब दानवे आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभेतून संधी देण्याबाबतही पक्षात चर्चा सुरू असल्याचे समजते.

अंतिम निर्णय दिल्लीहून?

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लवकरच दिल्लीला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

एकूणच भाजपमध्ये चार जागांसाठी इच्छुकांची मोठी यादी तयार झाली असून अंतिम निर्णयानंतरच या सस्पेन्सवर पडदा पडणार आहे. दिल्लीतील बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात पुढील समीकरणे स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *