अमरावती: ‘राणा विरुद्ध खोडके’ हा संघर्ष अमरावतीच्या राजकारणात नवा नाही. लोकसभा असो वा महापालिका, या दोन पारंपरिक विरोधकांमधील संघर्ष नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महापालिका निवडणुकीनंतर शहराचं राजकारण पूर्णपणे वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे.
भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीशिवाय पर्याय उरला नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली ताकद.
उपमहापौर निवडणुकीत ‘टर्निंग पॉईंट’
सुरुवातीला खोडकेंनी राणांच्या उपमहापौरपदाच्या उमेदवाराला मदत न करण्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र भाजपचे प्रदेश नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनंतर चित्र बदललं. रवी राणांनी खोडकेंची मनधरणी केली आणि अखेर राष्ट्रवादीची मते युवा स्वाभिमानच्या पारड्यात पडली.
या एका निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणातील समीकरणं उलटी झाली. आजच्या घडीला सत्तेची चावी रवी राणांकडे असली तरी त्यांचं ‘नाक’ संजय खोडके यांच्या हातात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
२० वर्षांचा संघर्ष, आजची अपरिहार्य गरज
२००४ मध्ये बडनेरा मतदारसंघातून सुलभा खोडके पहिल्यांदा आमदार झाल्या, तेव्हाच राणा–खोडके संघर्षाला सुरुवात झाली. २००९ मध्ये रवी राणांनी अपक्ष म्हणून खोडकेंचा पराभव केला आणि वाद अधिकच तीव्र झाला.
२०१४ मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादीत दाखल झाल्या, लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि खोडके दाम्पत्याने उघड विरोध केला. परिणामी दोघांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाली. पुढे काँग्रेस, पुन्हा आघाड्या, पुन्हा संघर्ष—हा सिलसिला थांबला नाही.
२०१९ मध्ये नवनीत राणा खासदार आणि रवी राणा आमदार असताना देखील दोन्ही गटांतील दरी कायम राहिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष महायुतीसाठी घातक ठरला. अंतर्गत नाराजी, फोटो वापरण्यावर बंदी आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे नवनीत राणा यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
आजची परिस्थिती: सत्ता टिकवायची असेल तर…
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राणा दाम्पत्याला वास्तव स्वीकारावं लागलं आहे. महापालिकेत काँग्रेसच्या जागाही निर्णायक ठरत असल्याने पुढील पाच वर्षे सत्ता टिकवायची असेल, तर राष्ट्रवादी आणि खोडकेंना दुखावून चालणार नाही.
खोडकेंनी बदल्यात नेमकं काय पदरात पाडून घेतलं आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित—अमरावतीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची आणि संजय खोडकेंची बार्गेनिंग पॉवर मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अशातच बशीर बद्र यांची ओळ आठवते
“दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.
”अमरावतीच्या राजकारणात हीच ‘गुंजाइश’ आज निर्णायक ठरताना दिसते.