धाराशिव: जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावत असतानाच धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंब तालुक्यातील देवळाली गावात प्रचाराच्या सांगता रॅलीदरम्यान शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मनीषा वाघमारे यांच्या अंगावर गरम तेल सांडल्याने त्या गंभीररित्या भाजल्या आहेत.
खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनीषा वाघमारे निवडणुकीच्या रिंगणात असून, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देवळाली गावात त्यांच्या सांगता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात धगधगत्या मशाली घेऊन रॅली काढण्यात येत होती.
दरम्यान, रॅली सुरू असतानाच मनीषा वाघमारे यांचा अचानक पाय अडकल्याने त्या तोल जाऊन पडल्या. याच वेळी त्यांच्या हातातील पेटत्या मशालीतील गरम तेल त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात त्यांच्या हातांना आणि पायांना गंभीर भाजल्या जखमा झाल्या.
घटना घडताच रॅलीत एकच खळबळ उडाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना धाराशिव येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, सर्व स्तरातून मनीषा वाघमारे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.